Verification: d74e5bf16d135a91
top of page
Search

राजश्रीने रिलीज़ केले ‘उंचाई’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर सूरज बडजात्यांच्या उंचाईमध्ये...

Writer: SUYASH PACHAURISUYASH PACHAURI

राजश्रीने रिलीज़ केले ‘उंचाई’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर सूरज बडजात्यांच्या उंचाईमध्ये देशातील प्रख्यात अभिनेते प्रथमच एकत्र!



राजश्रीने आपल्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि मल्टीस्टारर चित्रपट ‘उंचाई’चा पहिला लूक काही दिवसांपूर्वी रिलीज केला होता. चित्रपटाच्या पहिल्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा पहिला लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि त्यांनी या लूकला डोक्यावर घेतले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून राजश्रीने आता ‘उंचाई’चे दुसरे पोस्टर रिलीज केले आहे. ‘उंचाई’ हा २०२२ मधील सगळ्यात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे.




या चित्रपटात प्रथमच भारतीय चित्रपटसृष्टीतील आठ दिग्गज कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफीसा अली सोधी यांच्याही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा भूमिका आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना एकत्र आणलेल्या राजश्रीच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन यशस्वी दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांनी केलेले आहे. हा चित्रपट ११.११.२२ ला संपूर्ण देशभर रिलीज केला जाणार आहे.




‘उंचाई’च्या या नव्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हिमालयातील एका कोरलेल्या दगडावर आव्हानात्मक ट्रेकमधून विश्रांती घेत बसलेले दिसत आहेत. या पोस्टरमध्ये पार्श्वभागी माउंट एव्हरेस्टही दिसत आहे. अनुपम खेर घरचे शिजवलेले अन्न खातानाही पोस्टरमध्ये दिसत आहेत, प्रेक्षक नेहमीच राजश्रीच्या चित्रपटातून जी कौटुंबिक मूल्य पाहू इच्छितात त्याचाच प्रत्यय हा फोटो देत आहे. मैत्री, प्रेम यावर आधारित राजश्रीचे चित्रपट असतात आणि प्रेक्षकांना ते आवडतातही. ‘उंचाई’ चित्रपटही तसाच असून या चित्रपटाची टॅगलाइन – ‘मैत्री ही त्यांची एकमेव प्रेरणा होती’ अशी आहे. या पोस्टरमधून बर्फाच्छादित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मैत्रीची उबदारता स्पष्टपणे दिसून येते.




राजश्री प्रॉडक्शन गेल्या ७५ वर्षांपासून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात असून ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने ‘उंचाई’ चित्रपट रिलीज केला जात आहे. कमलकुमार बडजात्या, स्वर्गीय राजकुमार बडजात्या आणि राजश्रीचे अजित कुमार बडजात्या द्वारा निर्मित ‘उंचाई’ ही राजश्रीची ६० वी चित्रपट निर्मिती आहे. राजश्री प्रॉडक्शनने महावीर जैन फिल्म्सचे महावीर जैन आणि बाउंडलेस मीडियाच्या नताशा मालपाणी ओसवाल यांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. राजश्री, जैन फिल्म्स आणि बाऊंडलेस मीडियाचा हा पहिलाच संयुक्त उपक्रम आहे.



राजश्रीच्या सर्वच चित्रपटांप्रमाणे, ‘उंचाई’ हा चित्रपट भव्य व्हिज्युअल असलेला चित्रपट असून दिग्गज कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने साकारला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करील यात शंका नाही. मैत्रीचा हा अविस्मरणीय प्रवास असलेला ‘उंचाई’ चित्रपट ११.११.२२ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे

Comments


bottom of page